गोंडवाना विद्यापीठात “युगनायक स्वामी विवेकानंद” अध्यासन केंद्र सुरू होणार..
अधिसभा सदस्य प्रशांत दोंतुलवार ह्यांनी केला प्रस्ताव दाखल.
श्रेयश वानखेडे:
दिनांक १४ मार्च २०२४ रोजी संपन्न झालेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अधिसभेमध्ये अधिसभा सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतुलवार यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे, “युगनायक स्वामी विवेकानंद” अध्यासन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्ताव अधिसभेने एकमताने मंजूर करून पारित करण्यात आला.
स्वामी विवेकानंद यांच्या सार्द शतीनिमित्त देशात व विदेशात युवा जागरण व राष्ट्र जागरणाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. आपल्या मातृभूमीला जगात सर्वश्रेष्ठ स्थान मिळवून द्यायचे असेल तर शारीरिक आणि आत्मिक सामर्थ्याची उपासना आवश्यक आहे. असे आग्रहाने साऱ्या युवाजगताला सांगणारा; युगनायक स्वामी विवेकानंद यांच्या ओजस्वी विचाराची आजच्या युवा पिढीला गरज आहे.
समता बंधुता आणि सामर्थ्य यांची उपासना करत देशात एक्याचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने महाविद्यालय शिक्षण व उच्च शिक्षणातून स्वामी विवेकानंद यांचे विचार व प्रेरणेतून ज्ञानाची निर्मिती करणारा विद्यार्थी युवक तयार व्हावा. आत्मिक सामर्थ्याची उपासना करणारी नवी युवा पिढी तयार होण्याच्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे “युगनायक स्वामी विवेकानंद” अध्यासन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतुलवार ह्यांनी मांडला व अधिसभे ने प्रस्तावाला बहुमताने मंजुरी दिली. दिनांक १९ जून २०२४ रोजी हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती पर्वावर अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतुलवार, गुरुदास कामडी, डॉ. विवेक गोर्लावार यांनी सदर अध्यासनाचा परिपूर्ण लेखाजोखा असलेला प्रस्ताव विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना सादर केला.
युगनायक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र प्रस्तावाच्या अनुषंगाने दिनांक १४ मार्च २०२४ च्या आधिसभेच्या कार्यवृत्तातील बाब क्रमांक २० वर कार्यवाही घेऊन विद्यापीठ प्रशासनाने सदर विषयाच्या अनुषंगाने, विद्यापीठाचे कुलसचिव यांनी विस्तृत प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिलेले होते. त्यानुसार अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतुलवार ,गुरुदास कामडी, डॉ.विवेक गोर्लावार यांनी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना दिनांक १९ जून २०२४ रोजी युगनायक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राचा प्रस्ताव सादर केला. या अध्यासन केंद्राला शासन व विद्यापीठ प्रशासना मान्यता मिळवून ,११ सप्टेंबर दिग्विजय दिनाच्या पर्वावर दिनांक ११ सप्टेंबर २०२४ ला या अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.