गटर लाईनच्या निर्माण कार्यातून नवनिर्मित डांबरीकरणाचे रस्तेही तोडली जाणार: जनतेचा करोडो रुपये मातीमोल
प्रशासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराचे उत्तम उदाहरण
श्रेयश वानखेडे:
१६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार, ब्रम्हपुरीत मलनिःसारण प्रकल्प (भूमिगत गटार लाईन) १२९.६९ कोटी रुपये खर्चून संपूर्ण शहरात करण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील रस्ते तोडण्यात येणार आहेत. तथापि, सध्या ४३१,९३,३५६ (कोटी) रुपये खर्चून डांबरीकरणाची कामे सुरु आहेत, जी अनेक सुरळीत रस्त्यांवर केली जात आहेत. हे काम पूर्णपणे नियोजनशून्य असून प्रशासनाच्या बेजबाबदार भ्रष्टाचाराचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
हे डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असून अशा रस्त्यांवर होत आहे जिथे रस्ते खराब नाहीत. भवानी वार्डातील रस्ता, रेणुका माता चौकातील रस्ता पूर्णतः सुस्थितीत असूनही त्याच रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु ज्यांना सुधारणा आवश्यक आहे, त्या रस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यासह निष्कृष्ट दर्जाचे साहित्य रस्त्याच्या कामात वापरात येत आहे. यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे आणि हे प्रशासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराचे उत्तम उदाहरण आहे.
नगरपरिषद अंतर्गत गटार लाईनच्या कामामुळे रस्ते तोडले जातील याची पूर्ण माहिती असूनही, प्रशासनाने विकास कामे गटार लाईनचे काम होईपर्यंत थांबवली नाहीत. गटार लाईनचे काम करताना तोडलेले रस्ते पुन्हा बनविण्याची जबाबदारी गटर लाईनच्या कंत्राटदाराची असतानाही, सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामांवर होणारा ४३१,९३,३५६ रुपये खर्च टाळण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट तरतूदीकडे दुर्लक्ष करणे हे केवळ आर्थिक घोटाळ्याचे लक्षण आहे.
तरीही, डांबरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम आपसातील कंत्राटदार व आर्थिक फायद्यासाठी केले जात आहे. शहरातील अनेक लोकवस्त्यांमध्ये रस्ते व नाल्यांची सुविधा नाही, जिथे कामे होणे अत्यावश्यक आहे, तिथे दुर्लक्ष केले जात आहे. उपलब्ध रस्त्यांवर गरजेशिवाय डांबरीकरणाचे काम करून जास्तीत जास्त कमिशन मिळविण्याचा हेतू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः, ब्रम्हपुरी बाजार चौक ते पेठवॉर्ड मार्गावरील तळ्याची पाळीचा रस्ता गेली अनेक वर्षांपासून तुटलेला आहे, परंतु या रस्त्याचे कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
सध्या सुरू असलेली कामे तात्काळ थांबविण्यात यावीत आणि अप्रत्यक्ष जनतेचे ४३१,९३,३५६ कोटी रुपये मातीमोल होऊ नयेत यासाठी सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे. नगरपरिषदेला गटार लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतरच नवीन विकास कामांना सुरुवात करण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. प्रशासनाच्या या भ्रष्टाचारी आणि नियोजनशून्य कारभारामुळे जनतेत प्रचंड आक्रोश पसरला आहे