ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास
ओबीसी मुला-मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन


Shreyash Wankhede: आज ओबीसींसाठी वसतीगृह स्थापन होत आहेत. पण पूर्वी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माझी चर्चा झाली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असायला हवे, यावर शिक्कामोर्तब झाले. फाईल स्वाक्षरीसाठी माझ्याकडे आली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता स्वाक्षरी केली. आणि ९ मार्च २०१७ ला महाराष्ट्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले. ओबीसींच्या कल्याणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
ओबीसीं मुला-मुलींच्या वसतीगृहांचे उद्घाटन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दीड ते दोन वर्षांत अतिशय सुंदर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतीगृह तयार होतील. नाशिकच्या धरतीवर डिझाईन तयार केले आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे अॅड. पुरुषोत्तम सातपुते, भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे, सहायक आयुक्त श्रीमती कवाडे, अरुण तिखे, विलास माथनकर,प्रा. अनिल डहाके, गोमती पाचभाई, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजूरकर, संदीप आवारी, पुरुषोत्तम सहारे, सुर्यकांत खनके, उमेश कोराम, सुभाष कासमगोट्टुवार, अजय सरकार, सविता कांबळे, श्रुती गवारे, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणणे, अफजलखानाच्या कबरीचे अतीक्रमण हटवणे किंवा भवानी मातेसाठी रत्नजडीत छत्र उभे करणे असेल, मला ही कामे करता आली, हे माझं भाग्य आहे. रायगडावर आता दरवर्षी राज्य सरकारच्याच वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव बदलण्याची इच्छा वारंवार मांडली होती. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी ही मागणी मान्य करून छत्रपती संभाजीनगर असे नाव केले. त्यात माझाही खारीचा वाटा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये लंडन येथे ज्या घरी शिक्षणासाठी मुक्कामाला होते, त्या घराला स्मारक करण्याची संकल्पना पुढे आली. त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे भाग्य देवेंद्रजींसोबत मलाही लाभले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा प्रयत्न आहे. मी १६ मार्च १९९५ मध्ये आमदार झाल्याबरोबर पहिली घोषणा वाचनालयाची केली होती. आज चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील दिड हजार विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहेत. मुंबईत एखादा पीएसआय किंवा विभागाचा अधिकारी भेटतो. तो अभिमानाने सांगतो की आपण सुरू केलेल्या वाचनालयात अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालो आणि इथेपर्यंत पोहोचू शकलो. माझेही मन आनंदाने भरून येते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
स्व. बाबा आमटे यांच्या सेवाकार्याची दखल म्हणून शासनातर्फे डाक तिकीट प्रकाशित केले. पण त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उत्तम अभ्यासिका आवश्यक आहे असे मला वाटले. आज स्व. बाबा आमटे अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा आयपीएस-आयएएसचा टक्का वाढला पाहिजे, असे मला सातत्याने वाटायचे. मी याकडे सभागृहात लक्ष वेधले. त्यानंतर ठराव झाला आणि समिती तयार झाली. आता महाराष्ट्राचा टक्का वाढला. ट्रेनिंग सेंटर अत्याधुनिक झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढवली, हे सांगतानाच ना. श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ३०० ओबीसी विद्यार्थ्यांना आणि ३०० ओबीसी विद्यार्थिनींना आधार योजना देण्याचा निर्णय केल्याची माहितीही दिली.
त्यांना तुरुंगात टाकू
आर्थिक स्थिती बळकट
चंद्रपूरच्या शैक्षणिक प्रगतीसाठी…
श्रुती गवारे विध्यार्थिंनीने मानले आभार
|
|









