प्रभाग क्रमांक १० मधील एकदंत लॉनमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ कारवाईची मागणी
*ज्योत्स्ना वानखेडे*:
बल्लारपूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये कार्यरत असलेल्या एकदंत लॉन मुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने नगर परिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शाहिद शेख यांनी केली आहे.
संबंधित लॉनमध्ये वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने कार्यक्रमांच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच कार्यक्रमानंतर उष्टे अन्न व इतर कचरा सार्वजनिक नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते, नाल्या तुंबतात आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय कार्यक्रमांच्या वेळी घरांसमोर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असून ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारांवर तात्काळ नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
नागरिकांकडून कार्यक्रमांसाठी अवाजवी व मनमानी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने संबंधित लॉनची सखोल चौकशी करून सर्व नियम व परवान्याच्या अटींची पडताळणी करावी. आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित लॉनचा परवाना स्थगित अथवा रद्द करून सर्व त्रुटी दूर होईपर्यंत लॉन बंद ठेवण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमानी, नगरसेवक सुमित उर्फ गोलू डोहने, नगर सेवक प्रणित सातपुते व नगरसेविका प्रतिनिधी शाहिद शेख यांनी केली आहे.