डॉ. बादलशाहा चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Shreyash Wankhede:
समाज परिवर्तनात शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे. समाजात आई-वडीलानंतर शिक्षकाला महत्वपूर्ण स्थान आहे. शिक्षकाला जर एका मोठ्या पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान मिळत असेल तर ती त्याच्या जीवनातील महत्वपूर्ण बाब असते. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन 30 मार्च, 2025 रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृह, झाशी राणी चौक नागपूर येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देश विदेशातील सामाजिक, शैक्षणिक, सहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना तसेच लेखक व शिक्षकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बादलशाहा डोमाजी चव्हाण यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. राजेश गायकवाड सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या हस्ते “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित ” करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीपककुमार खोब्रागडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रकाश करमाडकर, डॉ. जगन कराडे, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. सुनिल रामटेके, डॉ. विलास तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांच्या ” सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष ” या ग्रंथाला चंद्रपूर येथील शब्दांगण बहूद्देशिय संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून सदर ग्रंथ गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पदव्यूत्तर मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.