Saturday, December 6, 2025
HomeEducation“कॉपीमुक्तीकडून मुक्त कॉपीकडे !”
spot_img

“कॉपीमुक्तीकडून मुक्त कॉपीकडे !”

“कॉपीमुक्तीकडून मुक्त कॉपीकडे !”

चुकीच्या मार्गाने यश मिळवून, मुळात डोक्यात नसलेल्या ज्ञानाच्या संपादणुकीचे भासमान प्रमाणपत्र आणि पदवी प्राप्त करून जीवनात यशस्वी होता येत नाही. या भासमान यशाचे क्षणभर कौतुक तर होईल मात्र आयुष्यभर मनस्ताप, अवहेलना आणि पर्यायाने मग अपयश वाटायला येते. अशा या कचाट्यात नांदेड जिल्ह्यातील कितीतरी पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. कारणे कोणतीही असोत, पण याचे परिणाम मात्र फक्त विद्यार्थ्यांच्या वाट्याला आले. दहावी-बारावीत चमकलेला गुणवंत पुढच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि शिक्षकी शिक्षणासाठी पात्र तर ठरला ! मात्र तिथले ज्ञान त्याला पेलवेनासे झाले. मग अर्धवट शिक्षण सोडून, दिशाहीन, उदासीन, मग कधी नाईलाजच म्हणून आत्मघात.

सहज मिळणाऱ्या आणि विना मेहनतीने जमणाऱ्या पैशाच्या लोभापायी काही शाळांनी अशा फसव्या गुणवंताची दुकानदारी सुरू केली. त्याला एका उद्योगाचे रूप आले. सर्वच पातळ्यावर मात्र या सर्वांचा परिणाम भोगावा लागला तो फक्त विद्यार्थ्यांना. त्यांच्यासोबतच त्यांच्या आई-बापांचेही स्वप्न उध्वस्त होऊ लागले. हा उद्योग इतका राजरोस चालला की, मार्च, 2009 च्या परीक्षेत साडेतीन हजार विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी केली म्हणून वर्षभर प्रवाहापासून दूर राहावे लागले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याची राज्यभर बदनामी झाली.

या सर्व पार्श्वभूमीवर गुणवत्तेचा ध्यास आणि अट्टाहास असलेले दूरदर्शी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांनी कॉपीमुक्ती अभियानाची संकल्पना मांडली. कॉपी प्रकरणात, मासकॉपी, तोतया विद्यार्थी, यंत्रणेकडून कानाडोळा किंवा प्रोत्साहन, प्रश्नपत्रिका फुटणे, आदी सर्व मागील अनुभवांच्या आधारे वॉटरटाईट प्रोग्राम तयार करण्यात आला. प्रारंभी त्यासाठी सकारात्मक विचारांची भूमी तयार करण्यासाठी बैठका, कार्यशाळा, मार्गदर्शन मेळावे अशा माध्यमातून संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे उद्बोधन करण्यात आले. काही उद्योगी शिक्षण प्रेमींना जेव्हा आपली दुकानदारी संकटात येतेय असे वाटले, तेव्हा अप्रत्यक्ष, आडून असहकाराची, अशक्यतेची भाषा कानी पडू लागली, मग प्रशासनाने कायदा सांगून तंबी देताच सारे चिडीचूप झाले.

या धाडसी अभियानात खंबीर साथ लाभली, ती तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.अशोकराव चव्हाण यांची आणि शिक्षण मंत्री मा.श्री. बाळासाहेब थोरात यांची. आपल्या जिल्ह्याची बदनामी होईल यापेक्षा, खरी गुणवत्ता समोर येऊन गुणवंत पिढी निर्माण होऊन, जीवनात यशस्वी होण्याचे प्रमाण वाढेल या भूमिकेतून मा.श्री.अशोकराव चव्हाण यांनी या कामाचे केवळ कौतुकच केले नाही तर खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे सांगून आधार दिला. मा.श्री.बाळासाहेब थोरात यांनी पाठराखण केली. या आधाराने हे अभियान मग अधिक गतिमान झाले. महसूल, शिक्षण व पोलीस या तीन यंत्रणांच्या संयुक्त सहकार्यातून कॉपी समूळ नष्ट झाली. काही किरकोळ घटना नगण्य प्रकारात घडल्या सुद्धा. मात्र अत्यंत शांत वातावरणात परीक्षा झाल्याने खरे गुणवंत समोर आले. महाराष्ट्रातून इयत्ता बारावीत पहिली आलेली कु.दिव्या बियाणी या विद्यार्थिनीने तर या नियोजनामुळेच मला हे यश मिळाले अशी प्रतिक्रिया दिली. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त! वर्गात, व्हरांड्यात आणि शाळेच्या बाहेर चहूदिशांनी………

याचा परिणाम निकाल खूप खाली आला. दहावीचा निकाल मार्च, 2009 साली 90% होता तो  2010 साली 31% इतका लागला. नंतर विद्यार्थी आणि शिक्षक सजग झाले. मार्च, 2011 साली 53% पर्यंत वाढला आणि नंतर वाढतच गेला.

महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर, 2010 रोजी नांदेड येथे संपन्न झाला. जिल्ह्याने केलेल्या नियोजनाचे आणि कॉपीमुक्ती अभियानाचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.अशोकराव चव्हाण आणि शिक्षण मंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात यांनी जाहीर कौतुक केले. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे हे काम एक पॅटर्न म्हणून राज्यभर लागू करण्यात आले.

एक मात्र झाले……… जे आभासी यश मिळविण्यासाठी आणि ते मिळवून देण्यासाठी निर्माण झालेले सारेच मार्ग बंद झाले. काही नाराज झाले. परंतु नंतर पुढच्या पिढीच्या चांगुलपणासाठी राजीही झाले. नंतर विद्यार्थी अभ्यासाला लागले. शिक्षकांचे प्रयत्न वाढले. गुणवत्तेसाठीच साऱ्यांची धडपड सुरू झाली. या धडपडीची फळ काही वर्षांनी पदरात पडतील असे वाटत असतानाच “कॉपीमुक्ती” कडून “मुक्तकॉपी” कडे वाटचाल सुरू झाल्याच्या बातम्या कानावर यायला सुरुवात झाली.

ऐकून कानामध्ये गरम सीसे उतरल्यासारखे वाटले.

राम पवार

अमरावती

भ्रमणध्वनी : 9284196496

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page