विरुर पोलिसांची धाडसी बचाव मोहीम: पूरग्रस्त नाल्यात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवले
श्रेयश वानखेडे :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि धरणांचे पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक रस्ते आणि पुलांवरून पाणी वाहत आहे. अशाच परिस्थितीत विरुर पोलिस ठाणे हद्दीतील वरुण ते विरुर मार्गावरील एका नाल्यामध्ये एसटी महामंडळाच्या दोन बस अडकून पडल्या.
या बसमध्ये सुमारे २५ ते ३० शाळकरी विद्यार्थी आणि २५ ते ३० ग्रामीण प्रवासी होते. ही घटना सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास चिचबोर्डी व सिरशी गावाजवळ घडली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक शासकीय वाहनासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहिले की, बसमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक सकाळपासून उपाशी होते. पोलिसांनी त्वरित बिस्किटे, नाश्ता व पाणी वाटप केले आणि सर्वांना धीर दिला.
पोलिस पथक जवळपास अडीच तास घटनास्थळी थांबले. जेव्हा नाल्यातील पाण्याची पातळी कमी झाली, तेव्हा शासकीय वाहनाच्या सहाय्याने दोन्ही बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना डोंगरगाव, सुबई, कविडपेठ, चिंचोली आदी गावी सुखरूप पोहोचवण्यात आले.
ही संपूर्ण बचाव मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेमध्ये सहाय्यक पो.नि. संतोष वाकडे यांच्यासह परि. पो.उप.नि. दत्ताहरी जाधव, पो.ह. विजय मुंडे, पो.अं. राहुल वैद्य, पो.अं. हर्षल लांडे, पो.अं. हर्षल चौधरी, पो.अं. विभीषण खटके, पो.अं. सौरव पगडपेल्लीवार, चालक पो.अं. संजय कोडापे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलिसांची जनतेस आवाहन:
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पूरग्रस्त भागात प्रवेश करू नये, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास टाळावा, आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
विरुर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि सेवा-भावना यामुळे अनेक निष्पाप जीव वाचले. ही घटना पोलिस दलाच्या कर्तव्यपरायणतेचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.