शिक्षण विभागातील राजपत्रित अधिकारी आठ ऑगष्ट पासून बेमुदत संपावर जाणार
श्रेयश वानखेडे:
मागील तीन-चार महिन्यापासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ बाबतचे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अत्यंत अपमानाचास्पदरीत्या झालेल्या अटकेचा संघटनेच्या वतीने शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी निषेध करत आहेत.
वरील प्रकरणात खरोखर ज्यांनी बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केला असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी संघटनेची मागणी आहे. तथापि सदर प्रकरणात ” चोर सोडून संन्याशाला फाशी” या म्हणी प्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागातील अधिकारी प्रचंड ताण-तणावाखाली काम करत आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे कुटुंबीय सुद्धा समाजात अपमानास्पद रित्या जीवन जगत आहेत. महाराष्ट्र शिक्षण सेवेतील अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे काम नियमानुसार व प्रामाणिकपणे करत असतात. ते गुन्हेगार नसून कदाचित काम करत असतांना काही त्रुटी, चुका होऊ शकतात. त्यासाठी विभागांतर्गत चौकशीची व कारवाईची व्यवस्था कार्यरत आहेत. अधिकारी त्यांच्या कामात अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे शास्तीची तरतूद आहे. तथापि छोट्या छोट्या प्रशासकीय कारणांवरून शिक्षण विभागातील अधिकारी यांचे शासनाची परवानगी नसतांना विना चौकशी अमानवीय पद्धतीने अटक सत्र सुरू आहे. या बाबींचा निषेध म्हणून व जोपर्यंत शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांना विभागाच्या परवानगी शिवाय विनाचौकशी अटकेपासून संरचनाची लेखी हमी शासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत राज्यातील शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी 1. शुक्रवार दिनांक:01/08/ 2025 रोजी एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले आहे. 2. एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक- शिक्षकेतर वेतन देयकावर प्रतिस्वाक्षरी करण्यात येणार नाही. 3. अतिरिक्त वीसी व सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यात यावा. या सर्व मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाले नाही. तर न्याय हक्क मागण्यासाठी सांविधानिक मार्गाने दिनांक: 08 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र जावक क्रमांक 171 दिनांक: 31/07/ 2025 रोजी मान. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मान. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मान. मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, मान. राज्यमंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, मान. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, मान. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिले आहे.