शिक्षकांचे शोषण करणाऱ्या ख्रिस्तानंद विद्यालय ब्रह्मपुरीची चौकशी व्हावी.– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी.
ज्योत्स्ना वानखेडे
ख्रिस्तानंद विद्यालय ब्रह्मपुरी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी मागील 13 फेब्रुवारी 2026 पासून शाळेसमोर धरणे आंदोलन करीत आहे.
ख्रिस्तानंद विद्यालयाचे संस्थाचालक येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय नियमानुसार नियमित वेतन, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी कपात, वैद्यकीय रजा, ग्रॅच्युईटी, तसेच कामाच्या वेळा चे पालन करीत नसल्या मुळे व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळोवेळी नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देत असल्यामुळे येथील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी फार मानसिक दबावाखाली काम करीत होते.
या अन्यायाचा उद्रेक होऊन सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी एकत्रित येऊन न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करीत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार माननीय नागो गाणार सर व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार माननीय अतुलजी देशकर तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कॉन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर यांनी वरील आंदोलनाची दखल घेऊन माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर व माननीय शिक्षणाधिकारी चंद्रपूर जिल्हा यांना चौकशी करून उपोषणकर्त्या शिक्षकांना न्याय देण्याबाबत निवेदन करण्यात आले आहे.
ख्रिस्तानंद विद्यालय ब्रह्मपुरी येथील उपोषणकर्त्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा पाठिंबा जाहीर केला आहे.
ख्रिस्तानंद विद्यालय संस्थाचालकांनी उपोषणकर्ते शिक्षकांच्या न्याय मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.