Saturday, June 20, 2026
HomeChandrapurयोग हा निरोगी राहण्याचा प्रभावी नैसर्गिक उपाय - आ. किशोर जोरगेवार
spot_img

योग हा निरोगी राहण्याचा प्रभावी नैसर्गिक उपाय – आ. किशोर जोरगेवार

योग हा निरोगी राहण्याचा प्रभावी नैसर्गिक उपाय – आ. किशोर जोरगेवार

राजीव गांधी सभागृहात योग नृत्य परिवार ट्रस्ट व जेसीआय चंद्रपूर एलिटतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Jyotsna Wankhede : योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याची कला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग हा निरोगी राहण्याचा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राजीव गांधी सभागृह येथे योग नृत्य परिवार ट्रस्ट आणि जेसीआय चंद्रपूर एलिट यांच्या वतीने योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार देवराव भोंगळे, अशोक जीवतोडे, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, गोपाल मुंधडा, बलराम डोडाणी, मनपा गटनेते शेखर शेट्टी, विक्रम शर्मा, सुशील मुंधडा, अरविंद सोनी आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला अनेक अमूल्य देणग्या दिल्या आहेत. त्यापैकी योग ही एक महान देणगी आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेला योग आज जगातील १९० हून अधिक देशांमध्ये स्वीकारला गेला आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आणि आज संपूर्ण जग योगाचे महत्त्व मान्य करत आहे.

आपण अनेकदा आरोग्याची काळजी आजार झाल्यानंतर घेतो. परंतु योग आपल्याला आजार होण्यापूर्वीच त्यापासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य देतो. त्यामुळे योग ही केवळ उपचारपद्धती नसून प्रतिबंधात्मक जीवनशैली आहे. निरोगी समाज निर्माण करायचा असेल, तर प्रत्येक घरात योग पोहोचणे आवश्यक आहे.

यावर्षी ‘हेल्दी इंडिया, स्ट्राँग इंडिया’ ही संकल्पना समोर ठेवून आपण सर्वांनी निरोगी भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. देश सशक्त व्हायचा असेल, तर त्याचे नागरिक शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद असते. विशेषतः तरुण पिढीने मोबाईल, सोशल मीडिया आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कमी झालेल्या शारीरिक हालचालींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दररोज केवळ २० ते ३० मिनिटे योगासाठी दिल्यास आरोग्यामध्ये मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी आझाद गार्डन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page