Thursday, August 6, 2026
spot_img
HomeEducationगिरीशभैय्या ठाकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गिरीशभैय्या ठाकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गिरीशभैय्या ठाकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मानपत्र वाचनासह भव्य सत्कार; शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

*ज्योत्स्ना वानखेडे*: सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूरचे सहसचिव, ज्येष्ठ समाजसेवक, शिक्षणप्रेमी, उद्योजक व विविध सामाजिक उपक्रमांचे प्रेरणास्थान मा. श्री. गिरीशभैय्या ठाकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र वाचन करून त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूरचे उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनोद दत्तात्रेय उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. निनाद गड्डमवार, प्रसिद्ध डॉक्टर तथा खास मित्र मा. डॉ. राजीव देवईकर, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आरसीईआरटीचे माजी प्राचार्य मा. डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, ज्येष्ठ मान्यवर मा. श्री. अरुणजी घोटेकर, तसेच आरसीईआरटीचे प्राचार्य मा. डॉ. अनिल झेड. चिताडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गिरीशभैय्या ठाकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक आणि मानवतावादी कार्याचा प्रभावी आढावा सादर करण्यात आला. चित्रफितीनंतर गिरीशभैय्या ठाकर यांच्या कार्याचा गौरव करणारे मानपत्र वाचून दाखविण्यात आले. मानपत्रामध्ये त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक व मानवतावादी कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य, शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी दिलेले योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

प्रास्ताविक करताना आरसीईआरटीचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी गिरीशभैय्या ठाकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमध्ये गिरीशभैय्या ठाकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संस्थेच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या वृद्धीसाठी त्यांनी सातत्याने पाठबळ दिले आहे.

 यावेळी त्यांनी सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. शांताराम पोटदुखे यांचा उल्लेख करत गिरीशभैय्या ठाकर आणि शांतारामजी पोटदुखे यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या उभारणीसाठी केलेले संयुक्त प्रयत्न यांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद दत्तात्रेय यांनी आपल्या मनोगतात गिरीशभैय्या ठाकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समाजाभिमुख वृत्तीचे विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडले. त्यांनी गिरीशभैय्या ठाकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यामागील प्रेरणा आणि पार्श्वभूमी विषद केली. समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी गिरीशभैय्या ठाकर यांचा उल्लेख केला.

दिवाळीच्या सणामध्ये आश्रमशाळांतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची त्यांची परंपरा, गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्याची त्यांची वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव याविषयी त्यांनी विशेष माहिती दिली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आधार देण्याचे कार्य गिरीशभैय्या ठाकर यांनी सातत्याने केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांमध्ये ठेकेदार म्हणून कार्य करताना गिरीशभैय्या ठाकर यांनी गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. कामामध्ये प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन, दर्जेदार अंमलबजावणी आणि सार्वजनिक पैशाचा योग्य वापर ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे विनोद दत्तात्रेय यांनी सांगितले. त्यांनी अनेक विकासकामांच्या आठवणी सांगत गिरीशभैय्या ठाकर यांच्या कार्यनिष्ठेचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. शांताराम पोटदुखे, गिरीशभैय्या ठाकर, गड्डमवार साहेब आणि इतर मान्यवरांशी संबंधित अनेक संस्मरणीय प्रसंगांना उजाळा दिला. संस्थेच्या जडणघडणीच्या काळातील संघर्ष, विविध उपक्रमांच्या आठवणी तसेच काही विनोदी किस्से त्यांनी सांगितल्याने सभागृहात अनेकदा हास्याचे फवारे उडाले. त्याचबरोबर उपस्थितांना प्रेरणा देणारे अनेक प्रसंगही त्यांनी मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश पोटदुखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गिरीशभैय्या ठाकर यांच्या समाजसेवेचा, संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा गौरव केला. त्यांनी गिरीशभैय्या ठाकर यांचे व्यक्तिमत्त्व हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता आणि सेवाभावी वृत्ती हे त्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गिरीशभैय्या ठाकर यांच्या सेवाभावी वृत्ती, नेतृत्वगुण, साधेपणा, मैत्री जपण्याची कला, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र तसेच विकासकामांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचे सर्वांनी कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना गिरीशभैय्या ठाकर यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून सरदार पटेल मेमोरियल सोसायटी, सहकारी, शिक्षक, कर्मचारी, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांचा असल्याचे सांगितले. आयुष्यभर समाजाने दिलेल्या प्रेमामुळे आणि संस्थेने दिलेल्या संधीमुळेच काही चांगले कार्य करता आले, असे नमूद करत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

पुढील काळातही समाजहित आणि शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या गौरव सोहळ्यास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील गणमान्य व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, उद्योजक, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, हितचिंतक तसेच गिरीशभैय्या ठाकर यांचा मोठा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला आणि अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. देवश्री कोडगिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापनासाठी प्रा. मैत्रेयी वेलंकीवार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, दिमाखदार आणि यशस्वीरीत्या पार पडला.

गिरीशभैय्या ठाकर यांच्या समाजसेवा, शिक्षणप्रेम, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि मानवी मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव करणारा हा अमृतमहोत्सवी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page