Thursday, June 25, 2026
HomeMaharashtraमराठीला ज्ञान, तंत्रज्ञान आणि रोजगाराची भाषा बनविण्यासाठी आ.मुनगंटीवार यांची विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी
spot_img

मराठीला ज्ञान, तंत्रज्ञान आणि रोजगाराची भाषा बनविण्यासाठी आ.मुनगंटीवार यांची विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी

मराठीला ज्ञान, तंत्रज्ञान आणि रोजगाराची भाषा बनविण्यासाठी आ.मुनगंटीवार यांची विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी

चंद्रपूरमध्ये साकारणार मराठी भाषा भवन!

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्धा तास चर्चेनंतर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मराठी संवर्धनासाठी सर्वपक्षीय समितीच्या प्रमुख मार्गदर्शकपदी आ. मुनगंटीवार यांची होणार नियुक्ती

*Jyotsna Wankhede*: मराठी भाषेचा सन्मान, संवर्धन आणि मराठीला ज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रभावी भाषा बनविण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या अर्धा तास चर्चेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. मराठीला केवळ राजभाषा म्हणून नव्हे, तर ज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार आणि उपजीविकेची भाषा बनविण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्यांच्या या चर्चेची दखल घेत मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी चंद्रपूर येथे अत्याधुनिक मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सभागृहात केली.

चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी मराठी भाषेच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करत विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान मराठीत उपलब्ध करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहार कोशाचा आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भाषाविकासातील योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मराठी शब्दसंपदा अधिक समृद्ध करण्यासाठी स्वतंत्र प्रतिशब्द समिती स्थापन करण्याची मागणी केली.

याशिवाय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वपक्षीय आमदारांची समिती, तज्ज्ञ समिती, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची समिती, मराठी शिकवणारे आधुनिक ॲप, दर्जेदार साहित्याचे भाषांतर आणि मराठी भाषा भवन उभारण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यानुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची गरजही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.

आ. मुनगंटीवार यांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध समित्या लवकरच स्थापन करण्यात येतील, असे सांगितले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्थापन होणाऱ्या सर्वपक्षीय आमदार समितीच्या प्रमुख मार्गदर्शकपदी आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी मराठी भाषा विकास केंद्रांच्या पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर यांच्यासह चंद्रपूर येथे अत्याधुनिक मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. मराठी शिकवणारे आधुनिक ॲप, उत्कृष्ट साहित्याचे मराठीत भाषांतर आणि जागतिक स्तरावर मराठी भाषिकांना जोडणारे विविध उपक्रमही सरकार राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांमुळे मराठीला नवी दिशा मिळणार असून, चंद्रपूरमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याच्या घोषणेमुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक वैभवात मोलाची भर पडणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page