*चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भ नशामुक्त करण्यासाठी युवकांनी संकल्प करावा : डॉ. अशोक जीवतोडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा*
*जनता महाविद्यालयात १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाची सुरुवात*
*जनता महाविद्यालय व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा संयुक्त उपक्रम*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भ नशामुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. व्यसन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून त्याचे दुष्परिणाम कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या भवितव्यावर होत असतात. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या सहकाऱ्यांनाही नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करावे. निरोगी, सक्षम आणि संस्कारक्षम युवा पिढी घडविण्यातूनच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, तसेच नशाविरोधी जनजागृतीची चळवळ घराघरापर्यंत पोहोचवावी, असे प्रतिपादन जनता महाविद्यालयाचे सेक्रेटरी तथा भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान–२०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, चंद्रपूर केंद्राच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या या महाअभियानांतर्गत जनजागृती व सामूहिक प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन ८ ऑगस्ट २०२६ रोजी जनता महाविद्यालयात करण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
ब्रह्माकुमारी संस्थेने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयासोबत ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या माध्यमातून देशभरात विविध नशाविरोधी जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये व्यसनमुक्ती, सकारात्मक जीवनमूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाच्या टप्प्यातील पहिला कार्यक्रम जनता महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व् विद्यालयाच्या मा. कुंदादीदी यांच्यातर्फे करण्यात आले. व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांकडून ‘नशामुक्त भारत प्रतिज्ञा’ घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवकांनी सामूहिक शपथ घेत नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला.
या उपक्रमाबद्दल ब्रह्माकुमारी मेडिकल विंगतर्फे जनता महाविद्यालयाला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. व्यसनमुक्त, निरोगी आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, नशामुक्त भारताच्या दिशेने ‘विकसित भारताकडे एक सक्षम पाऊल’ म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जीवतोडे, सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. आशिष महातळे, प्राचार्य डॉ. देवेंद्र भगत, रवि देवाळकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.