*बल्लारपुरात मंडल यात्रेचे स्वागत*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी ओबीसी समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आयोजित सकल ओबीसी महामोर्चाच्या मंडल यात्रेचे बल्लारपूर शहरात आगमन झाले. या यात्रेच्या स्वागतासाठी नगर परिषद चौक, बल्लारपूर येथे मोठ्या संख्येने पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक एकत्रित आले.
यावेळी मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, न.प. बल्लारपूर) तसेच मा. श्री. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, जि. म. स. बँक, चंद्रपूर) श्री.अब्दुल करीम शेख- शहर अध्यक्ष बल्लारपूर व गटनेते न.प. बल्लारपूर,श्री विवेक खुटेमाटे ओबीसी समन्वय समिति माजी अध्यक्ष,श्री.गणपत इटणकर- शहर अध्यक्ष कांग्रेस ओबीसी बल्लारपूर, श्री. घनश्याम मूलचंदानी- स्वीकृत नगरसेवक न.प. बल्लारपूर, श्री. भास्कर माकोडे- स्वीकृत नगरसेवक न.प. बल्लारपूर, श्रीधरजी फटाले, अशोक चिताले यांनी उपस्थित राहून सकल ओबीसी महामोर्चाच्या या लढ्याला आपला पाठिंबा दर्शविला. तसेच उमेश कोराम (मुख्य संयोजक, सकल ओबीसी महामोर्चा) यांच्या नेतृत्वाखाली मंडल यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय, हक्क व विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट दाखवली. त्यानंतर संत तुकाराम सभागृह, बल्लारपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई यांनी मनोगत व्यक्त करत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकजूट, सामाजिक न्याय आणि जातनिहाय जनगणनेचे महत्त्व याबाबत आपली भूमिका मांडली. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपला ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जाहीर सभेत उपस्थित मान्यवरांनीही ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले.
संचालन नीतीण वरारकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विवेक खुटेमाटेनी केले.या सभेला मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.