भंडारा जिल्ह्यातील चार प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’ निकाली
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने समस्या निवारण सभा

Jyotsna Wankhede: जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सहविचार सभा १९ जानेवारी रोजी समिती कक्ष, जिल्हा परिषद, भंडारा येथे पार पडली. पाच तास चाललेल्या सभेत आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने ४ प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’ निकाली काढण्यात आली.
सुरुवातीला प्राथमिक विभागातील प्रलंबित विषयांवर सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या कार्यालयामध्ये थकबाकीचे देयके सादर न करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यावर संयुक्त कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
माध्यमिक विभागातील सभेमध्ये वेतन पथक अधिक्षक (माध्य.) श्रीमती दुपारे यांच्या कार्यालयात होत असलेल्या गलथान कारभाराबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांनी नाराजी व्यक्त करत कार्यालयातील प्रलंबित असलेले वैद्यकिय प्रतिपूर्ती देयके, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी देयक याबाबत सविस्तर चर्चा करून तात्काळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रलंबित प्रकरणे आजच्या आज निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सदर सभा पाच तास चालली.
दादाराम लुचे (भागीरथा भास्कर हायस्कूल भंडारा), नरेश मारबते (सरस्वती विद्यालय खापा /तुमसर) यांना मुख्याध्यापक पदाची पुढील आदेशापर्यंत मान्यता, नरेंद्र पडोळे (नगर परिषद कस्तुरबा गांधी विद्यालय तुमसर) यांना २३/६/२००३ ते २२/६/२००६ शिक्षण सेवक व दि १८/८/२००६ पासून नियमित शिक्षक व हिरालाल ढोणे (स. शि., शिव छत्रपती प्राथ. शाळा तुमसर) यांना वरिष्ठ श्रेणी मान्यतेचे ‘ऑन द स्पॉट’ पत्र देण्यात आले.
सदर सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) Sau. मनिषा गजभिये, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. रवींद्र सोनटक्के, वेतन पथक अधीक्षक दुपारे मॅडम, श्री. राहुल बावा, श्री. जगदीश जुनघरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह श्री. चंद्रशेखर रहांगडाले, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह श्री. राजेश धुर्वे, कार्याध्यक्ष श्री. बांते सर, विजुक्टाचे मार्तंडराव गायधने, श्री. कापगते, श्रीधर खेडीकर, श्री. अनंत जायेभाये, श्री. धीरज खाटीक, श्री. गभणे सर, श्री. विलास कापगते, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, कार्यालयातील संबंधित अधिकारी तसेच समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








