Tuesday, October 6, 2026
spot_img
HomeAmaravatiदारापूर येथील शैक्षणिक संकुलात 'पूर्णवेळ नोकरी अन् शासकीय शिष्यवृत्ती'चा गैरव्यवहार? तंत्रशिक्षण व...

दारापूर येथील शैक्षणिक संकुलात ‘पूर्णवेळ नोकरी अन् शासकीय शिष्यवृत्ती’चा गैरव्यवहार? तंत्रशिक्षण व समाज कल्याण विभागामार्फत सखोल चौकशी सुरू

दारापूर येथील शैक्षणिक संकुलात ‘पूर्णवेळ नोकरी अन् शासकीय शिष्यवृत्ती’चा गैरव्यवहार? तंत्रशिक्षण व समाज कल्याण विभागामार्फत सखोल चौकशी सुरू

*ज्योत्स्ना वानखेडे*:

दारापूर (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शैक्षणिक संकुलातील एका कर्मचाऱ्याने एकाच वेळी पूर्णवेळ नोकरीवर असताना नियमित विद्यार्थी म्हणून शासकीय शिष्यवृत्ती लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) आणि समाज कल्याण विभागाने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले असून, शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी समितीने संबंधितांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?

प्रा. रविकांत हरिभाऊ बोरकर (माजी विभागप्रमुख, यंत्र अभियांत्रिकी) यांनी शुल्क नियामक प्राधिकरण (FRA), समाज कल्याण विभाग आणि तंत्रशिक्षण संचालनालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी श्री. मुकेश माणिकराव बनसोड यांनी २०१७ ते २०२० या कालावधीत संस्थेची कोणतीही कायदेशीर पूर्वपरवानगी न घेता विक्रमशिला तंत्रनिकेतन येथे ‘डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ (नामांकन क्र. १७१४४४००६५) या पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी संस्थेतून नियमित पूर्ण पगार उचलला आणि त्याच वेळी समाज कल्याण विभागाची शासकीय शिष्यवृत्तीही नियमबाह्य पद्धतीने लाटून शासनाची आर्थिक फसवणूक केली, असा थेट आरोप बोरकर यांनी केला आहे.

महाविद्यालय प्रशासनाचा दावा: ‘कमवा व शिका’ आणि मानधन तत्त्व

या तक्रारीवर समाज कल्याण विभागाने विचारणा केली असता, विक्रमशिला तंत्रनिकेतन आणि तक्षशिला अभियांत्रिकी प्रशासनाने सादर केलेले खुलासे समोर आले आहेत:

 * विक्रमशिला तंत्रनिकेतन: प्राचार्यांनी स्पष्टीकरण दिले की, बनसोड हे पूर्णवेळ कर्मचारी नव्हते, तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत अर्धवेळ काम करून मानधन घेत होते. त्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ कायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला.

 * तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय: प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात म्हटले आहे की, बनसोडे हे ०१/०८/२०१७ ते ०१/११/२०२० दरम्यान मानधन तत्त्वावर सकाळी ६:०० ते १०:३० आणि सायंकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत कार्यरत होते, तर सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत ते नियमित शिक्षण घेत होते.

तक्रारदाराचा पलटवार: “दिशाभूल करणारे खुलासे; EPF आणि EOA नोंदी तपासा”

महाविद्यालयाच्या या स्पष्टीकरणावर प्रा. बोरकर यांनी तीव्र आक्षेप घेत समाज कल्याण विभागाकडे फेर-तक्रार दाखल केली. त्यांनी प्रशासनाचे खुलासे खोटे असल्याचे सांगत अनेक पुरावे मांडण्याची मागणी केली आहे:

 * बनसोडे यांच्या बँक खात्यात नियमित पूर्ण पगार जमा झाला असून त्यांचा भविष्य निर्वाह निधी (EPF) पूर्णवेळ कर्मचारी म्हणून कापला जात होता.

 * AICTE आणि MSBTE ला दरवर्षी सादर होणाऱ्या विस्तार मंजुरी अहवालात (EOA) वर्ष २०११ पासून बनसोड यांना अधिकृतरीत्या ‘फुलटाईम’ कर्मचारी दाखवण्यात आले आहे.

 * स्वतः बनसोड यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी एका अंतर्गत प्रकरणात सादर केलेल्या नोटरीकृत प्रतिज्ञापत्रात ते १ जुलै २०११ पासून अखंडित कार्यरत असल्याचे नमूद केले आहे.

 * पूर्णवेळ शिक्षणासाठी आवश्यक ७५% उपस्थिती आणि पूर्णवेळ नोकरी एकाच वेळी कशी शक्य झाली, असा प्रश्न उपस्थित करत बायोमेट्रिक हजेरी व सर्व्हिस बुकची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

विभागीय चौकशीतील साक्षीदारावरच संशयाची सुई

या प्रकरणाला संस्थांतर्गत वादाचीही किनार आहे. संस्थेने प्रा. बोरकर यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या अंतर्गत चौकशीत मुकेश बनसोड हे व्यवस्थापनाचे मुख्य साक्षीदार आहेत. यापूर्वी मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. दीपक विनायक शिरभाते यांनीही चौकशी समितीकडे अर्ज करून बनसोड यांच्या सेवेची पूर्वपरवानगी आणि EPF चे विवरण साक्षीदाराच्या उलटतपासणीसाठी मागितले होते. संस्था प्रशासनाने बोरकर यांची सेवा समाप्त केली असून, सूडबुद्धीतून ही तक्रार केल्याचा दावा संस्थेने केला आहे; तर दुसरीकडे तक्रारदाराने हा सरळसरळ शासकीय निधीचा अपहार असल्याचे म्हटले आहे.

चौकशी समितीची स्थापना; आज होणार सुनावणी

तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आदेशानंतर सहसंचालक अमरावती यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीने ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता विक्रमशिला तंत्रनिकेतन, दारापूर येथे प्रत्यक्ष चौकशी निश्चित केली असून, तक्रारदार प्रा. बोरकर आणि कर्मचारी मुकेश बनसोडे या दोघांनाही सर्व मूळ पुराव्यांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या सुनावणीत हजेरी पट, EPF नोंदी आणि बँक व्यवहारांवरून शासनाची फसवणूक सिद्ध होते की नाही, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page