जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना अडचणी; संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे आंदोलनाचा इशारा!
श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड बल्लारपूरचे शहर अध्यक्ष साहिल संजय घिवे यांनी आज दिनांक १७/१२/२०२४ रोजी उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन सादर केले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वारंवार अर्ज परत करण्याचे प्रकार घडत आहेत, एकाच कुटुंबातील मुलगा किंवा मुलीला जातीचे प्रमाणपत्र नुकतेच दिलेले असतांना मात्र त्यांच्याच कुटुंबातील बहिण, भावाचे, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र नाकारले जात आहे. तसेच अशिक्षित नागरिकांकडून टी.सी. (शाळा सोडल्याचा दाखला) आणण्याचा आग्रह धरला जातो, आणि अर्जदार स्वतः उपस्थित राहिल्यानंतरच प्रकरणांची सुनावणी करण्यात येईल असा तगादा लावला जात आहे.
नागरिकांकडे संपूर्ण कागदपत्रे असतानाही प्रमाणपत्रे देण्यात उशीर होत असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकाराला त्वरित आळा घालून प्रलंबित असलेली सर्व जातीचे प्रमाणपत्रे निकाली काढावीत, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अन्यथा, संभाजी ब्रिगेडकडून जन आंदोलन उभारले जाईल, त्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड बल्लारपूर चे शहर अध्यक्ष साहिल घिवे, सचिव निखिल वडस्कर, अनिकेत गजभिये, संकुल झाडे, सोनु तुरानकर, वैभव गोगुलवार यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.