Saturday, May 9, 2026
HomeMaharashtraआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मामा तलाव विकासाला गती
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मामा तलाव विकासाला गती

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मामा तलाव विकासाला गती

४५ मामा तलाव व इतर तलाव दुरुस्तीसाठी १५.७५ कोटींच्या निधीबाबत सकारात्मक निर्णय

मृद व जलसंधारण विभागाचे सचिवांचे मारोडा तलाव सौंदर्यीकरणासह लपा-मामा तलाव जोडणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश


Jyotsna Wankhede : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील माजी मालगुजारी व इतर तलावांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री. जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आयोजित या बैठकीत तलाव विकास, दुरुस्ती, सौंदर्यीकरण, जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ व तलाव पुनरुज्जीवनाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले.

यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांची सद्यस्थिती, तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, दुरुस्तीअभावी घटलेली जलसाठा क्षमता तसेच ग्रामीण भागातील पाणी उपलब्धतेवर होत असलेला परिणाम याबाबत सविस्तर माहिती मांडली. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकासाला अधिक गती मिळावी, तसेच तलाव दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता त्वरीत देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे जन्मगाव असलेल्या मारोडा येथील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा प्राधान्याने मांडत या ऐतिहासिक तलावाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर मारोडा तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्हासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील एकूण ४५ तलावांच्या दुरुस्ती व पुनरुज्जीवनासाठी अंदाजे १५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली. तलाव फुटीच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून आवश्यक दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत निधी उपलब्ध करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

यावेळी लपा तलावाला मामा तलावाशी जोडण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सचिव श्री. जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिले. तसेच संबंधित सर्व प्रस्ताव प्राधान्याने शासनाकडे सादर करून आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. आगामी जून २०२६ अधिवेशनातील “व्हाईट बुक” मध्ये संबंधित कामांचा समावेश करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी संबंधित तलावांची माहिती सादर करत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करण्यात येतील, असे सांगितले. जलसंधारण, शेती विकास, ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता आणि पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने बैठकीत घेण्यात आलेले निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बैठकीला श्री.खटके प्रादेशिक जलसंधारण अधिकारी नागपूर, प्रकाश पाटील अधीक्षक अभियंता मंत्रालय, निलिमा मंडपे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत तसेच जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुलकित सिंह सहभागी झाले होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page