*ज्योत्स्ना वानखेडे:* राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयातील एका ओएसडींना लक्ष करत सामाजिक कार्यकर्त्या *तृप्ती देसाई* यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळांच्या विविध मंजुरी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे हे आरोप केले आहेत. स्वयंसहाय्यित शाळांना अंतिम मान्यता, तुकडी वाढ आणि इरादा पत्र यांसारख्या विविध मंजुरीसाठी कश्तीतल्या लाखो रुपयांची मागणी केली जाते. तसेच, संबंधित ओएसडी स्वत:ला मंत्र्यांचा “पाहुणा” असल्याचे सांगत कुणालाही न जुमानता काम करत असल्याचाही आरोपदेखील देसाई यांनी केला आहे.
देसाई यांनी केलेल्या आरोपांनुसार,
– *शाळेसाठी मंत्र्यांच्या अंतिम मान्यतेसाठी : 5 लाख रुपये*
– *शाळेच्या तुकडी वाढीसाठी : 4 लाख रुपये*
– *शाळेच्या इरादा पत्रासाठी : 3 लाख रुपये*
अशी रक्कम आकारली जात असल्याचा दावादेखील देसाई यांच्याकडून करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, पैसे दिल्यानंतरही अनेक संस्थाचालकांना सहा-सहा महिने मंत्री कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
राज्यात शिक्षण क्षेत्र आधीच विविध समस्यांनी ग्रासले असताना अशाप्रकारच्या आरोपांमुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याशिवाय देसाई यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका शाळेची उभारणी करण्यासाठी संस्थाचालकांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागत असताना, विविध मंजुरीसाठी तब्बल 40 लाखापर्यंत आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा दावा करत या संपूर्ण व्यवस्थेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
तसेच, संबंधित ओएसडीचा कथित व्हिडिओ लवकरच समोर आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ येण्यापूर्वीच हा प्रकार थांबावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून स्वतंत्र चौकशी करावी आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.