मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार; राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव
चंद्रपूरचा युवा पॅटर्न: राजकारण आणि उच्च शिक्षणाचा सुवर्णमध्य साधत सूरज पेदुलवार यांना आचार्य (पीएच.डी.) पदवी जाहीर

Jyotsna Wankhede:
राजकारणात समाजकारणाचा वसा घेऊन वाटचाल करणारा कार्यकर्ता जर विद्याविभूषित असेल, तर समाजाला योग्य दिशा मिळते. याचाच एक आदर्श वस्तुपाठ चंद्रपूरचे युवा नेतृत्व श्री. सूरज बंडूजी पेदुलवार यांनी घालून दिला आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे सूरज पेदुलवार यांना नुकतीच ‘बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन’ (वाणिज्य व व्यवस्थापन शाखा) या विषयात प्रतिष्ठित अशी आचार्य (पीएच.डी.) पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे राजकीय गुरू आणि राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, माननीय आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सूरज यांचा विशेष सत्कार करत त्यांना कौतुकपत्र देऊन गौरव केला आहे.
मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सूरज पेदुलवार यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूरज यांनी सार्वजनिक जीवनातील व्यस्तता आणि राजकीय जबाबदाऱ्या सांभाळून संशोधन कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले, याबद्दल भाऊंनी त्यांचे कौतुक केले. राजकारणात अशा सुशिक्षित आणि अभ्यासू तरुणांची नितांत गरज असून सूरज यांचा प्रवास इतर युवा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत भाऊंनी व्यक्त केले. सूरज यांनी मा.आ. सुधीरभाऊंना आपले राजकीय गुरू मानून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली समाजकारणाची धुरा सांभाळली आहे.
संशोधनाचा विषय आणि शैक्षणिक गुरुंचे मार्गदर्शन
सूरज पेदुलवार यांनी “चंद्रपूर जिल्ह्यातील लघु उद्योगांच्या संदर्भात कर्मचारी आणि संस्थांच्या कार्यक्षमतेवर प्रशिक्षण आणि विकासाचा परिणाम” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला. त्यांच्या या खडतर आणि प्रदीर्घ संशोधनात त्यांना अनेक दिग्गजांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. नियाज शेख सर यांनी त्यांना संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक आणि वैचारिक दिशा दिली. तसेच सौ.लीना किशोर मामीडवार इन्स्टिट्युट ॲाफ मॅनेजमेंट स्टडीज ॲड रिसर्च कॉलेजचे प्राचार्य डॅा.चक्रवर्ती सर आणि विषयतज्ज्ञ डॉ. आर. पी. इंगोले सर यांनी सूरज यांच्या या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शैक्षणिक शिखर गाठता आल्याचे सूरज यांनी नमूद केले.
सूरज पेदुलवार यांचा शैक्षणिक प्रवास हा राजकारणात येणाऱ्या नवीन युवा पिढीसाठी एक धडा आहे. राजकारण म्हणजे केवळ निवडणुका किंवा प्रचार नव्हे, तर तो अभ्यासू वृत्तीने केलेला समाजकारणाचा एक भाग आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. स्वतः विद्याविभूषित राहून समाजकारण आणि राजकारणाचा सुंदर समन्वय कसा साधता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
या यशाचे श्रेय सूरज यांनी आपले आई-वडील, बहीण, जावई आणि संपूर्ण पेदुलवार कुटुंबाला दिले आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे, त्यांची धर्मपत्नी सौ. स्नेहल सूरज पेदुलवार हिची त्यांना वेळोवेळी मिळालेली भक्कम साथ, समजूतदारपणा आणि प्रोत्साहनामुळेच ते हे यश साध्य करू शकले, असे सूरज यांनी आवर्जून सांगितले.
एक युवा कार्यकर्ता ते ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) हा सूरज पेदुलवार यांचा प्रवास त्यांच्या कष्टाची आणि चिकाटीची साक्ष देतो. त्यांच्या या यशाबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








